शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी सचिवालयातील (ओल्ड सेक्रेटरीयट) अधिकारी / कर्मचारी एकत्र येऊन सन 1954 साली सचिवालय जिमखान्याची जुने सचिवालय येथे एका लहानश्या खोलीत स्थापना करण्यात आली. त्याचवेळी नवीन मंत्रालय बांधण्याचे कामकाज सुरू होते. परंतु जुने सचिवालय येथे असलेल्या एका रूममधूनच जिमखान्याचे कामकाज सुरू होते. नवीन मंत्रालय बांधून पूर्ण झाल्यानंतर त्याच्यासमोर शिल्लक राहिलेल्या जागेत सचिवालय जिमखाना बांधण्याचे शासनाने योजिले होते. त्यानुसार सन 1961 साली बांधकाम पूर्ण होऊन, तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालय जिमखान्याचे उद्धाटन होऊन कार्यकारी समितीकडे हस्तांतर करण्यात आला.
सचिवालय जिमखान्यामार्फत क्रीडा महोत्सव म्हणून “सचिवालय डे” साजरा करण्यात येत होता. या स्पर्धामध्ये महाराष्ट्र शासनाचे माननीय मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रीमंडळ, भा. प्र. से. अधिकारी व मंत्रालयातील अधिकारी / कर्मचारी भाग घेत होते. या स्पर्धेचा बक्षिस समारंभ मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत होता. या समारंभास सभासदांसह त्यांच्या कुटुंबियांची भव्य प्रमाणात उपस्थित असे. आता सचिवालय जिमखान्यामार्फत आंतर कार्यालयीन क्रीडा स्पर्धा भरविण्यात येतात. सदरहू स्पर्धेस मंत्रालय व मुंबईतील शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी वर्ग मोठया प्रमाणात भाग घेतात.
केंद्र शासनाच्या वतीने भारतातील निरनिराळया राज्यांमध्ये केंद्र शासनाचे व राज्याच्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.